मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

0
428

मुंबई, दि.१८ (पीसीबी) – मुंबई, ठाणे आणि कोकणात येत्या  २४  तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कालही मुंबई आणि कोकणात पावसाने हजेरी लावली. जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात धडकला, मात्र त्यानंतर पावसाने उसंत घेतल्याने बळीराजा चिंतेत होता. मात्र पुन्हा पावसाने दमदार एन्ट्री घेतल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे.

मान्सूनच्या पावसात खंड पडल्याने राज्यभरात पेरणीही रखडली होती. जोरदार सुरुवात केलेला मान्सून दडून बसल्याने राज्यातील शेतकरी काहीसा चिंताग्रस्त झाला होता. मात्र येत्या काही दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासात कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय. तर उर्वरीत राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

कालपासून कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली. किनार पट्टीच्या भागामध्ये पावसाने एन्ट्री घेतली. तर तळकोकणात पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळतायत. राजापूर, लांजा, रत्नागिरी, चिपळूण या भागामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. उत्तर आणि दक्षिण रत्नागिरीमध्येही पावसाचे प्रमाण अधिक आहे.