मुंबईत पावसाचा जोर कायम, भायखळा पोलिस चौकीत पाणी भरले

638

मुंबई, दि.९ (पीसीबी) – उन्हाच्या काहिलीतून सुटका करणाऱ्या मान्सूनचे आज मुंबई आणि उपनगरात जोरदार आगमन झाले. काल रात्रीपासून पावसाने मुंबईला झोडपून काढले. अनेक सखल ठिकाणी पाणी भरल्यामुळे यंदाही महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे बारा वाजल्याचे दिसून आले. मोसमी पाऊस मुंबईत दाखल झाला आणि मुंबई, ठाणे व राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनचे आगमन झाले अशी अधिकृत माहिती हवामान खात्याने दिली. मात्र रात्रभर पावसाने हजेरी लावल्याने त्याचा मुंबईतील रेल्वे सेवेवर परिणाम झाला. पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गवरील रेल्वे गाड्या २५-३० मिनिटे उशिराने धावल्या.

मात्र, या साऱ्या गोष्टींमध्ये एका गोष्टीने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. ते म्हणजे भायखळा पोलीस ठाणे. या पावसाचा जोर इतका होता की पावसामुळे भायखळा पोलीस ठाण्यात आतमध्ये पाणी भरले. तसेच, पोलीस ठाण्याच्या व्हरांड्यातही पाणी भरले. मात्र, त्यावर तातडीनमे काहीच उपाययोजना करणे शक्य नसल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच पाण्यात आपले काम सुरु ठेवले. तसेच. विविध कारणांसाठी आलेल्या नागरिकांनीही याच पाण्यातून आपली वाट तुडवली.

पुढील २४ तासांमध्ये मुंबई आणि उपनगरातील काही भागांमध्ये मुसळधार पाउस पडणार असल्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे.