मुंबईत तीन वर्षाचा चिमुकला गटरात पडला; शोध सुरु

88

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – घराबाहेरील उघड्या गटारात पडल्याने एक तीन वर्षाचा चिमुकला वाहून गेल्याची घटना गोरेगाव येथे घडली आहे. काल रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून बचाव पथक या चिमुकल्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून याला पालिकाच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गोरेगावच्या आंबेडकरनगर येथे ही घटना घडली असून काल येथे मुसळधार पाऊस सुरु होता. त्यातच या चिमुकल्याच्या घराबाहेरील गटार उघडे होते. त्यातून पावसाचे पाणी मोठ्या प्रवाहाने वाहत होते. दरम्यान, हा चिमुकला रात्रीच्या सुमारास खेळताना घराबाहेर आला यावेळी बाहेर काहीसा अंधार असल्याने तो चुकून या उघड्या गटारात पडला आणि त्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. घटनास्थळावरील बाजूच्या एका दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली त्यानंतर पोलीस, अग्निशामक दल आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या चिमुकल्याचा शोध सुरु केला.