मुंबईत चार्टर्ड विमान कोसळून पाच जणांचा मृत्यू

59

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – घाटकोपरमधील माणिकलाल परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या आवारात चार्टर्ड विमान कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज (गुरुवार) दुपारी घडली. हे विमान उत्तर प्रदेश सरकारचे असल्याचे समजते. अग्निशमन दल आणि आपातकालीन पथक घटनास्थळी पोहोचले असून घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

VTUPZ किंगएअर सी ९० हे या चार्टर्ड विमानाचा क्रमांक आहे.

सुरूवातीला माणिकलाल परिसरात आग लागल्याची अफवा पसरली. मात्र नंतर एक चार्टर्ड विमान कोसळल्याचे स्पष्ट झाले. या भागातून विमानतळ जवळ असून लहान हेलिकॉप्टरचे प्रशिक्षण देण्यासाठी हा मार्ग वापरला जातो. सध्या या परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासन, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. विमानामध्ये किती जण होते, पायलटची स्थिती काय आहे याबाबत काही माहिती मिळालेली नाही. विमानाला आग लागलेली असल्यामुळे आतल्या परिस्थितीचा अंदाज आलेला नाही आणि विमानाची आग विझवल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.