मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस अधिका-यांच्या निलंबनाचा प्रस्ताव

120

मुंबई, दि.२५ (पीसीबी) : मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २५ हून अधिक पोलिस अधिका-यांचे निलंबन करावे असा प्रस्ताव पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी गृह विभागाला दिला आहे. त्यामुळे पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता.

या प्रस्तावात परमबीर सिंह या महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश असल्याने कारवाई झाल्यास पोलिस दलाला हा मोठा धक्का असेल असे बोलले जात आहे. या प्रस्तावात चार उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच विविध प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून असलेले अनेक सहाय्यक दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची परवानगी मागण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे, याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडे मागवण्यात आली आहे. पांडे यांनी या आरोप असलेल्या अधिकाऱ्यांसंदर्भात भूमिका स्पष्ट केल्यानंतर कारवाईचा निर्णय होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीच्या आधारे अकोला पोलिसांनी सिंह आणि इतर १६ पोलिस अधिकाऱ्यांविरोधात पहिला एफआयआर नोंदवला. त्यानंतर २३ जुलै रोजी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यामध्ये एफआयआर नोंदवण्यात आला. दुसऱ्या दिवशी कोपरी पोलिसांनी तिसरा एफआयआर नोंदवला.

WhatsAppShare