मी शून्यात गेलो,  भावना उफाळून येत आहेत;  वाजपेयींच्या निधनामुळे मोदींना शोक

297

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे मी शून्यात गेलो, अशी भावनिक प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी दिली आहे. मोदी यांनी  सोशल मीडियावर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. मी शून्यात गेलो. परंतु, भावना उफाळून येत आहेत. आपले सर्वांचे लाडके वाजपेयी या जगात नाहीत. त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण देशाला समर्पित केला. त्यांचे जाणे एका युगाचा अंत आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (वय. ९३) यांचे आज (गुरूवार) सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वाजपेयी  यांच्यावर  ११ जूनपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते.  अखेर त्यांची एम्स् रूग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.  वाजपेयींच्या निधनामुळे अवघा देश हळहळ व्यक्त करत आहे. त्यांच्या रूपाने भारतीय राजकारणातील तारा ढगाआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

वाजपेयींना ११ जूनला किडनीच्या आजारामुळे एम्समध्ये दाखल केले होते. वाजपेयी २००९ सालापासूनच आजारी आहेत. त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागत होता. तसेच ते डिमेंशिया आजाराने त्रस्त होते. त्यांना मूत्र संसर्ग झाल्याचेही डॉक्टरांनी सांगितले होते.