मी मेल्यानंतर तुम्हाला समाधान मिळणार का? – जया प्रदा 

168

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – वादग्रस्त विधान करणारे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये. कारण हा माणूस निवडणूक जिंकला तर लोकशाहीचे काय होईल? समाजामध्ये महिलांना स्थान उरणार नाही.  आम्ही कोठे जायचे? मी मेल्यानंतर तुम्हाला समाधान मिळणार का?  असा सवाल भाजपच्या लोकसभा उमेदवार जया प्रदा यांनी केला आहे.  

तुम्हाला काय वाटते मी घाबरुन रामपूर सोडून निघून जाईन ? मी रामपूर सोडणार नाही असेही जया प्रदा यांनी ठणकावून सांगितले आहे. या आधीही आझम खान यांनी माझ्याबद्दल  आक्षेपार्ह वक्तव्य  केले आहे. त्यावेळीही कोणी मला पाठिंबा दिला नव्हता. मी एक महिला आहे. आझम खान जे बोलले ते मी पुन्हा बोलू शकत नाही. मी त्यांचे काय केले आहे ते मला समजत नाही.  ते सतत माझ्याबद्दल अशा पद्धतीने का बोलत असतात,  असे जया प्रदा म्हणाल्या.

दरम्यान, आझम खान यांनी जया प्रदा यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्या विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपनेही त्यांच्या विधानाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच  महिला आयोगानेही वादग्रस्त विधानाबद्दल  त्यांना  स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.