मीच पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार; मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास

267

नागपूर, दि. १६ (पीसीबी) – विदर्भ व मराठवाड्यातील उद्योजकांनी वीज दरवाढीची  काळजी करू नये.  कारण मीच पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे सरकार तुमच्या पाठीशी कायम राहिल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.  

विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचा (व्हीआयए) ५५वा स्थापना दिन आणि आयए-सोलर विदर्भ उद्योग गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रामदास पेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे आयोजित केले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विदर्भ व मराठवाडा व अनुसूचित क्षेत्रात उद्योगांना चालना मिळण्यासाठी वीज दरात सवलत दिली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या उद्योगांना कमी सवलत मिळणार असून नवीन उद्योगांना देखील याचा लाभ मिळत आहे. पण हे वीजदर मार्च २०१९ पर्यंत निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांनीच त्याला मुदतवाढ देण्याचे संकेत दिले आहेत.

समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे येथील उत्पादन थेट जवाहरलाल नेहरु ड्रायपोर्टवर जाणार आहे. केवळ १९ महिन्यांत भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.  लवकरात लवकर हा महामार्ग पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.