मिरजेत तीस लाखांचा चेक फडकावत भाजप जिल्हा उपाध्यक्षांची तिकीटाची मागणी

83

मिरज, दि. ३ (पीसीबी) – सांगली -मिरज महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन चौगुले यांनी तीस लाखांचा चेक फडकावत बोला, आता तरी तिकीट देणार काय ? अशी थेट विचारणा केली. याप्रकारावर उपस्थित पक्ष नेते आवाक् झाले.

चौगुलेंच्या प्रश्‍नावर पक्षश्रेष्ठी गोंधळले. त्यांना काय बोलावे हे सुचेना झाले. मिरजेत पक्षात जुने निष्ठावंत, नवीन आलेले आयाराम यांच्यात तिकीट वाटपावरून संघर्ष सुरु झाला आहे. भाजपकडून पैसेवाल्यांना उमेदवारी दिली जात आहे, असा आरोप जुन्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर जाहीरपणे भाष्य करण्याचे चौगुले यांनी धैर्य दाखवले.

प्रभाग क्रमांक ७ मधून निवडणूक लढवण्याची चौगुले गेले वर्षभर तयारी करत आहेत. मात्र, त्यांना उमेदवारी देण्यास डावलले आहे. यावर ते म्हणाले की, १० वर्षे पक्षासाठी जीवाचे रान करून पदरमोड करुन पक्षाचे कार्यक्रम राबवत आहे. आता संधी मिळेल असे वाटत असतानाच आयारामांच्या गळ्यात पक्षाने हार घातला. मला का डावलले याचे कारण पक्षाने दिले पाहीजे.

विनींग मेरीट हाच एकमेव निकष लावला जात आहे. पैसेवाल्यांना उमेदवारी मिळत आहे. मीदेखील तीस लाखांचा खर्च करण्यास तयार आहे. हा घ्या चेक, कोणाच्या नावे लिहू सांगा. बोला तिकीट देणार काय? असा जाहीर सवाल चौगुले यांनी केल्याने उपस्थित सर्व पक्ष नेते आवाक् झाले. त्यांच्या चेहऱ्याचा क्षणात रंग पालटला.