मित्रांनी केला खून आणि मृतदेह फेकला ओढ्यात

184

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) -दारू पिण्याच्या बहाण्याने तरुणाला नेऊन त्याचा खून केला. खून करून मृतदेह ओढ्यात फेकून पुरावा नष्ट केला. ही घटना शनिवारी (दि. 24) चऱ्होली बुद्रुक येथे उघडकीस आली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

गणेश लक्ष्मण गायकवाड (वय 34, रा. हडपसर, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गणेशचा चुलत भाऊ तुषार हरिदास गायकवाड (वय 40, रा. धनकवडी, कात्रज. मूळ रा. रिसे, ता. पुरंदर) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोहम्मद जहीर सुनशरीफ शेख उर्फ सलीम (वय 34, रा. लोहगाव, पुणे), गिरीश गुलाब गायकवाड (वय 44, रा. लोहगाव, पुणे) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश गायकवाड याला त्याचा मित्र आरोपी मोहम्मद आणि त्याच्या सोबत असलेला गिरीश या दोघांनी दारू पिण्याच्या बहाण्याने चऱ्होली बुद्रुक येथे नेले. तिथे गणेशच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. त्यात गणेशचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी गणेशचा मृतदेह गुलमोहर सोसायटीच्या समोरील ओढ्यात फेकला. तब्बल दोन आठवडे मृतदेह पाण्यात होता. शनिवारी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.