माहेरहून पैसे आणावेत म्हणून निगडीतील विवाहितेस सासरकडच्यांकडून अमानुष मारहाण

117

निगडी, दि. १४ (पीसीबी) – माहेरहून पैसे आणावेत म्हणून सासरकडच्या मंडळींनी विवाहितेस शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने कपाळावर, तोंडावर आणि हातावर जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. याघटनेत महिलेचा हात आणि दात तुटले असून डोळ्याला देखील गंभीर इजा झाली आहे. ही घटना शुक्रवार (दि.१२) रात्री दिडच्या सुमारास निगडी त्रिवेणीनगर झोपडपट्टी चर्चसमोरील पाण्याच्या टाकीजवळ घडली.

याप्रकरणी पिडित २८ वर्षीय विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विलास गायकवाड आणि बायडाबाई गायकवाड (दोघे रा. त्रिवेणीनगर झोपडपट्टी, निगडी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दिडच्या सुमारास आरोपी विलास आणि बायडाबाई यांनी त्यांच्या २८ वर्षीय सुनेला माहेरहून पैसे न आणल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने कपाळावर, तोंडावर आणि हातावर जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. याघटनेत सुनेचा हात आणि दात तुटले असून डोळ्याला देखील गंभीर इजा झाली आहे. तसेच तिला जाळून टाकण्याची धमकी देखील आरोपींनी दिली. याप्रकरणी आरोपी विलास आणि बायडाबाई या दोघांना अटक करण्यात आली आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.