मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे यांची उमेदवारी धोक्यात; शिवसेनेकडून तगड्या उमेदवाराचा शोध

393

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. शिवसेनेने आपल्या कोट्यातील २३ लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार निश्चित करताना मावळ लोकसभा मतदारसंघात बारणे यांच्या नावावर अद्यापपर्यंत शिक्कामोर्तब केले नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. बारणे यांच्याऐवजी अन्य उमेदवार देण्याच्या राजकीय हालचाली सुरू आहेत. काहीही करून पार्थ पवार यांना आसमान दाखवू शकेल, अशा उमेदवाराच्या शोधात शिवसेना आहे. असा उमेदवार सापडला नाही, तरच श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे उमेदवार असतील किंवा हा मतदारसंघ भाजपला सुटण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी तुटलेली युती आता लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा झाली आहे. युतीच्या दोन्ही पक्षांमध्ये महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांचे जागा वाटप झाले आहे. त्यामध्ये भाजप २५, तर शिवसेना २३ जागांवर लढणार आहे. शिवसेनेने आपल्या वाट्याच्या २३ जागांपैकी १९ जागांवर संभाव्य उमेदवार घोषित केले आहेत. उर्वरित मावळ, उस्मानाबाद, सातारा आणि हिंगोली या चार लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अद्यापही निश्चित करण्यात आलेले नाहीत.

पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत. बारणे यांनाच पुन्हा शिवसेनेची उमेदवारी मिळेल, असे सांगितले जात होते. परंतु, या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर राजकीय चित्र बदललले आहे. त्यातून श्रीरंग बारणे यांची शिवसेनेची उमेदवारी धोक्यात आली आहे. बारणे यांच्या जागेवर अन्य तगड्या उमेदवाराला संधी देण्याचा शिवसेनेचा विचार आहे.

शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनाही लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी पक्षश्रेष्ठींकडून विचारणा झाल्याचे समजते. परंतु, कलाटे यांनी पक्षश्रेष्ठींपुढे लोकसभेऐवजी विधानसभेला पसंती दिल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांना आसमान दाखवू शकेल, अशा उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी अनेक नावांवर चाचपणी सुरू असल्याचे समजते. तगडा उमेदवार सापडला नाही, तरच श्रीरंग बारणे यांना पुन्हा लॉटरी लागण्याची शक्यता आहे. तसेच असा उमेदवार सापडला नाही, तर हा मतदासंघ भाजपला सुटण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.