मावळमधील मतदारांनो, बारणे किंवा पार्थ कोणालाही निवडून द्या; त्यांची हजारो कोटींची संपत्ती होईल, तुमचे काय?

456

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करताना महायुतीचे पदाधिकारी ही निवडणूक म्हणजे जनशक्ती विरूद्ध धनशक्तीचा लढा असल्याचे सांगत आहेत. स्वतः श्रीरंग बारणे हे १०२ कोटींच्या संपत्तीचे मालक, तर राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्याकडे अवघ्या २९ व्या वर्षी २० कोटींहून (कुठे काम केले कोणालाच सांगता येणार नाही) अधिकची संपत्ती आहे. या दोघांपैकी कोणीही निवडून आले तरी त्यांची संपत्ती कोटींच्या कोटी उड्डाणे घेणार हे निश्चित आहे. त्यामुळे मावळ मतदारसंघाची लढाई ही “धनशक्ती विरूद्ध जनशक्ती” आहे का?, याचा मतदारांनी खरोखरच विचार करण्याची वेळ आली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात अजितदादांचे पुत्र पार्थ पवार हे राष्ट्रवादीकडून लढत आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पार्थ पवार यांच्या विरोधात शिवसेनेने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीकडून घाटाखालील राजाराम पाटील हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे अन्य छोटे राजकीय पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण २१ उमेदवार मावळ मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत.

या मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजे २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. उमेदवारांना प्रचारासाठी भरपूर वेळ मिळणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांचा प्रचार आहिस्ते-आहिस्ते सुरू आहे. गाठीभेटींवर भर देण्यात आला आहे. मोठ्या नेत्यांच्या सभांना अजून सुरूवात व्हायची आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करताना पदाधिकारी ही निवडणूक म्हणजे “जनशक्ती विरूद्ध धनशक्ती” असल्याचे सांगत आहेत. अजितदादा हे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री होते. त्यांच्यावर सिंचन घोटाळ्यात ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अजितदादा हे आपले पुत्र पार्थ पवार यांनी निवडून आणण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

त्यामुळेच महायुतीचे पदाधिकारी बारणे यांच्या विजयासाठी ही निवडणूक म्हणजे “जनशक्ती विरूद्ध धनशक्ती” असल्याचे प्रचारात सांगत आहेत. प्रत्यक्षात महायुतीचे उमेदवार स्वतः श्रीरंग बारणे हे १०२ कोटींहून अधिकच्या संपत्तीचे मालक आहेत. दहावीपर्यंत शिकलेल्या बारणे यांची ही संपत्ती ऐकून मतदारांना तोंडात बोट घालण्याची वेळ आली आहे. हे कमी की काय म्हणून अवघे २९ वय असलेल्या पार्थ पवार यांची संपत्ती ऐकून मतदारांचे डोकेच चक्रावून जाईल, अशी स्थिती आहे. पार्थ पवार यांच्याकडे २० कोटींहून अधिकची संपत्ती आहे. पार्थ पवारांनी काय काम केले आणि घाम गाळून कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक झाले?, हा मतदारांच्या संशोधनाचा विषय होऊ शकतो.

एकीकडे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे १०२ कोटींचे मालक, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार हे २० कोटींचे मालक आहेत. मावळ मतदारसंघात या दोन कोट्यधीशांमध्येच प्रमुख लढत होत आहे. या दोघांपैकी कोणीही निवडून आले, तरी त्यांची संपत्ती हजारो कोटींच्या घरात जाणार हे कोणा ज्योतिषाला सांगण्याची गरज नाही. कागदावर दाखविली जाणारी खरी संपत्ती वेगळी आणि न दाखविली जाणारी संपत्ती वेगळी असते, हे आता मतादारांना देखील कळते. अशा लोकांवर सरकारची धाड पडते की नाही, हेही मतदारांना ठाऊक आहे. त्यामुळे मावळ मतदारसंघाची लढाई ही “धनशक्ती विरूद्ध जनशक्ती” आहे का?, याचा मतदारांनी खरोखरच विचार करण्याची वेळ आली आहे.