मालकाला न विचारता चालकाला विचारून रिक्षा नेली दापोडीत टोळक्याचा राडा

67

दापोडी, दि. ७ (पीसीबी) – रिक्षाच्या मालकाला न विचारता रिक्षाचालकाला विचारून नाष्टा करण्यासाठी रिक्षा नेल्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने बेकायदेशीर जमाव जमून राडा घातला. तसेच पाच जणांना मारहाण करून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना 31 मे रोजी जयभिमनगर, दापोडी येथे सार्वजनिक रोडवर घडली.

चांद अख्तर शेख (वय 22), फिरोज उर्फ बा दिलावर शेख (वय 46), रमजान शेख (वय 33), ताज शेख (वय 30), फरीदा अख्तर शेख (वय 42), जुबेदा उर्फ झुब्बा (वय 60), रज्जो (वय 48, सर्व रा. जयभिमनगर, दापोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी चांद शेख आणि फिरोज शेख यांना अटक केली आहे. याबाबत कल्पना मनिष वाल्मिकी (वय 46, रा. दापोडी) यांनी रविवारी (दि. 6) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा नरेश वाल्मिकी याने 31 मे रोजी आरोपी फरीदा यांची रिक्षा त्यांना न विचारता त्यांच्या रिक्षा चालकाला विचारून नाश्ता करण्यासाठी नेली. त्या कारणावरून त्यांच्यात भांडणे झाली होती. त्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी, त्यांची दोन मुले आणि मुलांचे दोन मित्र यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लाकडी दांडके व कोयता दाखवून परिसरात दहशत निर्माण केली. यामुळे फिर्यादी आणि त्यांची मुले तसेच त्यांचे मित्र घाबरून पळून गेले. याबाबत सहा दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare