मार्च मध्ये कोरोना लस देशात उपलब्ध

32

पुणे, दि. १७ (पीसीबी) – कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. कोरोना प्रतिबंध करणारी लस (Coronavirus Vaccine) शोधण्यासाठी वैज्ञानिक आणि संशोधक दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत. काही लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. या वर्षाखेर अथवा पुढील वर्षात पहिल्या तीन महिन्यात लस भारतात उपलब्ध होण्याची दाट शक्यता सिरम इन्स्टिट्यूटनं व्यक्त केली आहे.

मार्च २०२१ पर्यंत भारताला कोरोनावरील लस मिळू शकते, असं ‘सिरम इन्स्टिट्यूट (Serum Institute)चे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं आहे.

सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. करोनाचा फैलाव रोखणाऱ्या लशीच्या निर्मिती संदर्भात सिरमने फक्त ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाच (Oxford-AstraZeneca)नाही, तर जगातील वेगवेगळया लस संशोधन करणाऱ्या संस्थांबरोबर करार केले आहेत.

इंडियन एक्सप्रेसने डॉक्टर सुरेश जाधव यांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, ‘अनेक कंपन्या कोरोना विषाणूवरील लस शोधण्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. भारतात लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु आहेत. दोघांवर तिसऱ्या फेजच्या लसीचा डोस देण्याची तयारी सुरु आहे. तर एकावर दुसऱ्या फेजचा डोस देण्याचा ट्रायल सुरु आहे. सिरमने अस्त्राझेनेकाप्रमाणेच अमेरिकन बायोटेक कंपनी कोडेजेनिक्स बरोबरही लस निर्मितीचा करार केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, कोरोना विषाणूवरील लस पुढच्या वर्षी दुसऱ्या तिमाहीपर्यंत तयार व्हायला हवा. त्या म्हणाल्या की, जानेवारी २०२१ पर्यंत आपल्याला परिणाम दिसेल आणि २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत SARS-CoV-2 (करोना विषाणू) विरोधात लस तयार व्हायला हवी.

WhatsAppShare