‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’; असं म्हणत तरुणीच्या साथीदारांनी केले ‘असे’ काही

206

चिखली, दि. 26 (पीसीबी): सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर दारू पीत बसलेल्या मुलांना एका तरुणाने हटकले आणि घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर दारू पिणा-या मुलांनी दोन तरुणींना बोलावून आणले. त्यातली एक तरुणी तिच्या साथीदारांना म्हणाली, ‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’. त्यानंतर तरुणींच्या साथीदारांनी तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 25) दुपारी चिखली मधील घरकुल मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली.

विशाल दशरथ शिंदे (वय 25, रा. घरकुल चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 22 वर्षीय आणि 24 वर्षीय तरुणी (दोघी रा. घरकुल चिखली) आणि त्यांच्या अन्य साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास दोघेजण घरकुलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बियर पीत बसले होते. त्यावेळी फिर्यादी तिथून जात होते. बियर पीत बसलेल्या मुलांना फिर्यादी यांनी ‘इथे कशाला बसलाय. घरी जा’ असे सांगितले. त्यानंतर मुले निघून गेली.

काही वेळाने बियर पिणा-या मुलांनी आरोपी दोन तरुणींना बोलावून आणले. त्यातील एक तरुणी म्हणाली, ‘आण रे दारू. कोण आपल्याला अडवतो ते पाहू’ असे म्हणून तिने शिवीगाळ केली. भांडण नको म्हणून फिर्यादी निघून जात होते. त्यावेळी दुस-या आरोपी तरुणी म्हणाली, ‘आता कशाला पळतोय. थांब तुला दाखवते’.

दरम्यान, तिथे दोन दुचाकींवरून पाचजण आले. आरोपी तरुणींच्या सांगण्यावरून पाच जणांनी फिर्यादीवर कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केली. एक आरोपी तरुणी जुन्या भांडणाच्या कारणावरून तिच्या पाच साथीदारांना म्हणाली, ‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare