मारहाण करुन लुटणाऱ्या तिघांना पिंपरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
697

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकांना विनाकारण अडवून मारहाण करत लुटणाऱ्या तिघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या आरोपींकडून तब्बल १ लाख ८४ हजार ८५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

विजय उर्फ बन्या दत्तात्रय सरोदे (वय २१, रा. ओटा स्कीम निगडी), विजय म्हसु कांबळे (वय २८, रा. ओटा स्कीम निगडी) आणि किशोर नारायण ढवळे (वय २८, रा. पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि.२२) संध्याकाळच्या सुमारास हर्षद कुंभार हा तरुण त्याच्या मित्रांसोबत पिंपरीतील एच ए मैदानाच्या कोपऱ्यावर थांबला होता. त्यावेळी आरोपी विजय सरोदे, विजय कांबळे आणि किशोर ढवळे हे तिघे दुचाकीवरून तेथे आले. त्यातील एकाने ‘अंगावर का थुंकलास’ असा विनाकारण जाब विचारत हर्षद यांच्या मित्राला मारहाण करून त्याचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. हे भांडण सोडविण्यासाठी हर्षद गेले असता आरोपींनी त्यांना एका धारदार शस्त्राने मारून जखमी केले. आरोपींनी हर्षद यांचा मोबाईल फोन आणि ६०० रुपये रोख रक्कम असा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.

त्यावेळी स्थानिक नागरिकांनी आरोपी विजय सरोदे याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पिंपरी पोलिसांनी आरोपी विजय सरोदे याला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असता पोलिसांनी त्याची कसून चौकशी करून त्याचे इतर दोन साथीदार विजय कांबळे आणि किशोर ढवळे यांना अटक केली. तिन्ही आरोपींनी हर्षद कुंभार यांना मारहाण करून लुटल्याची कबुली दिली आहे. तसेच अन्य ठिकाणी देखील नागरिकांना अडवून लुटल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक दुचाकी, १६ मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ८४ हजार ८५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख अधिक तपास करत आहेत.