मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे थेरगांवातील हरवलेली मुलगी सुखरूपपणे पोहोचली घरी

179

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – मानवाधिकारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हरवलेल्या १४ वर्षीय मतिमंद मुलीला सुखरूपपणे आईवडिलांच्या स्वाधीन केले. थेरगांव गुजरनगर येथील महादेव कॉलनीत राहणारी तेजस्विनी महेंद्र अडसुळ ही मतिमंद मुलगी बसमधून निगडीतील भक्ती शक्ती चौकात उतरली होती. या भेदरलेल्या मुलीला आईवडिलांच्या ताब्यात दिल्याने परिसरातील नागरिकांकडून मानवाधिकार कार्यकर्त्यांचे कौतुक केले जात आहे.

शुक्रवारी (दि.५) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तेजस्विनी थेरगांवातून निगडीच्या बसमध्ये बसून निगडीतील भक्ती शक्ती चौकात उतरली. दरम्यान ती  भेदरलेल्या अवस्थेत तिथेच घटमळू लागली. त्यानंतर एका रिक्षावाल्याला तेजस्विनी दिसली असता तिने तिच्याकडे आईवडिलांचे नांव विचारले. मात्र, भेदरलेल्या तेजस्विनीला नांव काही सांगता आले नाही. त्यानंतर रिक्षावाल्यांने याबाबतची माहिती मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय निरीक्षक रामराव नवघन आणि सचिव सतिश नगरकर यांना फोन करून माहिती दिली. तातडीने मानवाधिकार संघटनेचे अविनाश रानवडे, अशोक इंगळे यांनी भक्ती-शक्ती चौकात जाऊन तेजस्विनीची अधिक चौकशी केली असता तिने आईवडिलांचे नांव आणि घरचा पत्ता सांगितला.

त्यानंतर तेजस्विनीला सतिश नगरकर यांच्या घरी  आणले. नगरकर यांनी याची माहिती वाकड पोलिसांना दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.बी. पाटील हवालदार अबीद शेख यांनी नगरकर यांच्या घरी येऊन मुलीची चौकशी करून तिच्या आईवडिलांच्या नावाची आणि घरच्या पत्याची खातरजमा करून घेतली. त्यानंतर त्या मुलीला तिच्या आईवडिलांकडे सुखरूपपणे स्वाधीन करण्यात आले. याबद्दल तेजस्विनीच्या आईवडिलांनी मानवाधिकार संघटनेचे आणि वाकड पोलिसांचे आभार मानले.