माध्यमांसमोर जो बायडेन यांना अश्रू अनावर; आपल्या सैनिकांना गमावल्याचं दु:ख अपार

189

वॉशिंग्टन, दि.२७ (पीसीबी) : काबूल विमानतळाबाहेर झालेल्या दोन विध्वंसक आत्मघातकी हल्ल्यात अमेरिकेचे तेरा सैनिक शहीद झाले आहेत. आपल्या सैनिकांना गमावल्याचं दु:ख राष्ट्राध्याक्ष जो बायडेन यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. ते राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेवर पहिल्यांदाच एवढा मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे. व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांचे डोळे अनेकदा भरून आले होते.

अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाबाहेर गुरूवारी रात्री एकामागोमाग दोन स्फोट झाले. हा आत्मघातकी हल्ला इसिसच्या दहशतवाद्यांनी घडवून आणल्याचं स्पष्ट झालं आहे. इसिसनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यांत जवळपास 90 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे 13 अमेरिकी सैनिकांचा समावेश आहे. तसेच 150 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अफगाणिस्तानातून नागरिकांना बाहेर नेण्याची सर्वात मोठी मोहिम अमेरिकेनं सुरू केली होती. त्यासाठी अमेरिकेचे शेकडो सैन्य विमानतळ परिसरात तैनात आहे. तसेच नागरिकांचीही मोठी गर्दी झाली होती. त्याच ठिकाणी हा स्फोट करण्यात आला आहे. या स्फोटानंतर बायडेन यांनी शुक्रवारी देशवासियांना संबोधून भाषण केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पण पत्रकारांनी प्रश्न विचारण्यास सुरूवात केल्यानंतर ते आपली मान खाली घेत काहीकाळ शांतपणे उभे राहिले.

शहीद झालेल्या जवानांविषयी बोलताना ते अनेकदा भावूक झाले. त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळत होते. त्यांच्या आवाजातूनही ते सतत जाणवत होतं. जवानांना आदरांजली वाहत ते म्हणाले, काबूलमधून नागरिकांना बाहेर काढण्याची मोहिम 31 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. आम्ही दहशतवाद्यांना घाबरून ही मोहिम थांबवणार नाही. अमेरिकी सैनिकांनी अफगाणिस्तान सोडण्यासाठीची 31 ऑगस्टची मुदतीवरही त्यांनी पुन्हा शिक्कामोर्तब केलं. या तारखेपर्यंत अधिकाधिक नागरिकांना तिथून आणले जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, हल्ल्यानंतर नागरिकांना अफगाणिस्तानबाहेर नेण्याची मोहिम पुन्हा सुरू झाली. जर्मनीने ही मोहिम थांबवली आहे. तर अमेरिकेसह इतर देशांची विमाने नागिरकांना घेऊन उड्डाण करू लागली आहेत. असं असलं तरी अजूनही विमानतळ परिसरात भीतीचं वातावरण आहे. तालिबानने या हल्ल्यात इसिसला मदत केल्याचा कोणताही पुरावा अद्याप समोर आलेला नाही, असंही अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे विमानतळ पुर्वीप्रमाणेच सुरू करण्यात आले आहे.

WhatsAppShare