माथेफिरू तरूणाने एकतर्फी प्रेमातून मॉडेलला बनवले बंधक

7

भोपाळ, दि. १३ (पीसीबी) – एकतर्फी प्रेमातून प्रेयसीवर हल्ला केल्याच्या, तिची हत्या केल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. मात्र काही वेळापूर्वीच एक अशी घटना समोर आली आहे ज्यामध्ये माथेफिरू तरूणाने एका मॉडेलला एकतर्फी प्रेमातून बंधक बनवले आहे. ही घटना मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये घडली आहे. या तरूणाने स्वतःलाही रक्तबंबाळ केले आहे. तसेच त्याचे नाव रोहित असल्याची माहिती समोर आली आहे. रोहित उत्तर प्रदेशातील अलिगढचा राहणारा आहे. ज्या घरात त्याने तरूणीला बंधक बनवले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून ते त्याला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.

रोहित व्हिडिओ कॉलद्वारे आपले म्हणणे पोलिसांपर्यंत मांडतो आहे. त्याने ज्या मुलीला बंधक बनवले आहे ती मुलगी मॉडेलिंग करते. पोलीस तिला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. रोहित या माथेफिरू तरूणाकडे एक कात्री आणि एक देशी कट्टा आहे. पीडित मुलगी ही बीएसएनएलच्या माजी एजीएमची मुलगी आहे. हे सगळे प्रकरण एकतर्फी प्रेमातून घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. रोहितने पोलीस ठाण्याच्या समोरच्या इमारतीतल्या पाचव्या मजल्यावर या तरूणीला बंधक बनवले आहे. रोहितही मुंबईत मॉडेलिंग करतो अशी माहितीही समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित मुंबईत मॉडेलिंग करतो. मुंबईतच त्याची आणि पीडित मुलीची ओळख झाली. शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून एकतर्फी प्रेमातून त्याने या तरूणीला बंधक बनवले आहे. तरूणीने माझ्याशी लग्न केले नाही तर मी स्वतःवर गोळी झाडून घेईन अशी धमकी रोहितने दिली आहे. रोहित व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पोलिसांशी बोलतो आहे. पोलीस त्याला समजावण्याचा आणि मुलीची सुखरूप सुटका करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पीडित मुलीसोबत माझा वाद झाला होता असे रोहितने पोलिसांना सांगितले. कोणीही माझ्या जवळ आले तर मी स्वतःवर आणि त्या मुलीवर गोळी झाडून घेईन अशी धमकीच त्याने दिली. या घटनेची माहिती कळताच इमारतीच्या खाली गर्दी जमा झाली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार रोहितने स्वतःला आणि या मुलीला जखमी केले आहे. रोहित नशेत आहे आणि मुलगी जखमांमधून रक्तस्त्राव झाल्याने बेशुद्ध झाली आहे. त्याने आमच्याकडे स्टँप पेपर आणि मोबाईल चार्जरची मागणी केली आहे असेही पोलिसांनी सांगितले आहे. आम्ही बळाचा वापर करून घरात शिरण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने स्वतःवर आणि मुलीवर गोळी झाडण्याची धमकी दिली. आम्ही मुलीला पाहिले, तिच्या अंगावर जखमा आहेत आणि ती रक्तबंबाळ झाली आहे हे आम्ही पाहिले आहे असेही पोलिसांनी सांगतिले आहे.