मातोश्री २ साठी ५.८ कोटी चेकने मोजले, मग रोख किती दिले – संजय निरुपम यांचा सवाल

0

मुंबई, दि. ९(पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री 2’साठी 5.8 कोटी चेकने मोजले, मग रोख रक्कम किती दिली ? असा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी विचारला आहे. ‘स्टर्लिंग बायोटेक’ संदर्भात दिल्लीतील चौकशी संपली असेल, तर ईडीने मुंबईकडे मोर्चा वळवावा, अशा सूचना निरुपम यांनी केल्या.

‘स्टर्लिंग बायोटेक’चे संचालक राजभूषण दीक्षित आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या मोठ्या मालमत्ता कराराची चौकशी केली, तर अंमलबजावणी संचालनालयाला मोठी माहिती मिळेल, असा दावा संजय निरुपम यांनी ट्विटरवरुन केला. मातोश्री 2 हे राजभूषण दीक्षित (आणि त्यांचा भाऊ) यांच्याकडून विकत घेण्यात आले आहे. तेच दीक्षित, ज्यांना अटक करण्यात आली होती आणि नंतर 14 हजार कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांचे नाव आरोपपत्रात होते, ज्यामध्ये संदेसरा फरार आहे. सीबीआयसुद्धा या घोटाळ्याची चौकशी करत आहे, असे निरुपम यांनी लिहिले आहे.

“राजभूषण दीक्षित यांना मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबाने 10 हजार चौरस फूट जागेवर असलेल्या मातोश्री 2 साठी केवळ 5.8 कोटी रुपये दिले. बीकेसीच्या दर्शनी भागात असलेल्या या मालमत्तेची खरी किंमत मुंबईतील प्रॉपर्टी तज्ज्ञांच्या मते यापेक्षा खूपच जास्त आहे. चेक पेमेंट करण्यापलिकडे मोठे रोख व्यवहार झाले आहेत.” असा आरोपही निरुपम यांनी केला आहे.

“या कराराची कारवाई राजभूषण दीक्षित आणि त्याच्या भावाने केली होती का? याची ईडीने चौकशी करावी. त्यासाठी मालमत्ता कराराची सखोल चौकशी आवश्यक आहे”, असेही संजय निरुपम यांनी लिहिले आहे.

WhatsAppShare