‘मातोश्री’ बाहेर राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन; शरद पवारांवरील टीकेचा निषेध

270

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याच्या निषेधार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी आज (मंगळवार) दुपारी आंदोलन करून घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलक महिलांनी निवासास्थानामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले. यानंतर मातोश्रीबाहेर काही काळ तणावची परिस्थिती निर्माण झाली होती.   

उद्धव ठाकरे यांनी पगडीचे राजकारण करणाऱ्या पवारांचे डोकं ठिकाणावर आहे काय? अशा शब्दांत एका कार्यक्रमात सोमवारी टीका केली होती. उद्धव यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या मुंबई महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा पेडणेकर आणि राष्ट्रवादीच्या युवती काँग्रेसच्या अध्यक्षा आदिती नलावडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला कार्यकर्तीनी मातोश्री निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.

यावेळी महिला कार्यकर्त्यांनी ‘उद्धव ठाकरे हाय हाय’च्या घोषणाही दिल्या. तसेच पवारांबद्दलचे अपशब्द मागे घेत त्यांची माफी मागावी, अशी मागणी या महिला आंदोलकांनी केली. तसेच महिला आघाडीकडून उद्धव यांना ‘नी कॅम्प’ आणि वाघाची प्रतिकृती भेट म्हणून देण्यात आली. या आंदोलनानंतर मातोश्रीबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.