माणगावमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने खळबळ

524

रायगड, दि. ४ (पीसीबी) – माणगाव तालुक्यात असलेल्या ढाळघर गावातील एका घरात मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे.  सोमवारी (दि.३) रात्रीच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकून स्फोटके जप्त केली.

याप्रकरणी मोहम्मद हुमर झाहीर काझी (वय ४०) या इसमाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणगाव तालुक्यातील ढाळघर गावातील एका घरात स्फोटके असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार सोमवारी (दि.३) रात्रीच्या सुमारास पोलिसांनी त्या घरावर छापा टाकला. यावेळी घरातून मोठ्या प्रमाणात जिलेटीनच्या कांड्या आणि डिटोनेटर्स जप्त करण्यात आले असून मोहम्मद काझी या इसमाला अटक करण्यात आली आहे. मोहम्मदने ते घर भाडेतत्त्वावर घेतले होते. या स्फोटकांचा वापर खाणकामासाठी केला जाणार होता, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस मोहम्मदची कसून चौकशी करत असून त्याने ही स्फोटके कुठून आणि का आणली होती याचा  तपास सुरु आहे.