माझ्या धाकामुळे मस्तवाल दानवेंचे हेलिकॉप्टर जमिनीवर -अर्जुन खोतकर

104

जालना, दि. ७ (पीसीबी) –  भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सत्तेची मस्ती, सत्तेचा माज आणि सत्तेची गुर्मी आहे. माझ्या धाकामुळे त्यांचे हेलिकॉप्टर जमिनीवर आले आहे, अशा शब्दांत  शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी दानवेंवर हल्ला चढवला आहे.  

एका वृत्तवाहिनीशी बोलताना खोतकर म्हणाले की, जालना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर दानवेंचा प्रचंड दबाव आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार प्रचंड दहशतीखाली आहेत. दानवे जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना ४-४ तास बाहेर उभे करतात. त्यांना घर गड्यासारखे वागवतात. दानवे आणि त्यांच्या कुटुंबाकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे, असा आरोप खोतकरांनी दानवेंवर केला.

दानवे शिवसेना संपवायला निघाले आहेत. जालना जिल्ह्यात शिवसेना संपवण्यासाठी ते काम करतात, तुम्ही त्यांना समज द्यायला पाहिजे, अशा स्वरुपाची मी संजय राऊत यांच्याकडे तक्रार केली आहे, अशी माहितीही खोतकरांनी यावेळी दिली. दानवे यांना ‘मातोश्री’वर बोलवले नाही. भाजपच्या नेत्यांचाच दानवेंवर विश्वास नाही. दानवे गुप्तता पाळत नाहीत. ते त्या बैठकीच्या पात्रतेचे नाहीत म्हणून खुद्द पक्षांच्याच नेत्यांचा विश्वास नाही, असे खोतकर म्हणाले.