माझ्या घराची रेकी केल्याची पोलिसांना कल्पना दिली होती – जितेंद्र आव्हाड

445

मुंबई, दि. १ (पीसीबी) –  सनातनी, मनुवाद्यांच्या हिटलिस्टवर मी असेन, तर ती माझ्या कामाची पोचपावती आहे. आजवर मी जो लढा दिला त्याला मिळालेले हे यश आहे, असे मी मानतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली.  माझ्या घराची रेकी करण्यात आली होती, मी याबाबत पोलिसांना कल्पनाही दिली होती, असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या हिंदू कट्टरपंथीयांच्या हिटलिस्टमध्ये श्याम मानव, जितेंद्र आव्हाड, मुक्ता दाभोलकर आणि रितू राज यांचा देखील समावेश होता, अशी माहिती एटीएसने न्यायालयात दिली. याबाबत आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

आव्हाड म्हणाले की, महात्मा गांधींचीही हत्याच करण्यात आली होती. मात्र, महात्मा गांधींजींचे पुतळे उभारले गेले, त्यांचा विचार देशाने आणि जगाने स्वीकारला. नथुरामाचे पुतळे उभारण्यात आले नाहीत. संत तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवल्या, पण तुकाराम महाराजांचे विचार कसे संपवता येतील?

सनातनी, मनुवादी हे पाकिस्तानात जाऊन हाफिज सईदला का संपवत नाहीत? त्यांच्या रक्तात या लोकांविषयी चीड का नाही? असाही सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.   ज्या पुरोगामी महाराष्ट्राने समाज सुधारणेचा विचार देशात रुजवला, त्या राज्यात असे प्रकार घडतात, हे दुर्दैव आहे, असेही आव्हाड म्हणाले.