माझ्या अंगात शेषनाग संचारतो असं म्हणणाऱ्या ढोंगीबाबाचा पडदा फाश..

98

नागपूर , दि. १५ (पीसीबी) -कोरोनाच्या महामारीत प्रत्येक जण आपल्याला कोरोनापासून कसं वाचता येईल याचा प्रयत्न करत आहे. मात्र काहींनी कोरोनाच्या नावाने अंधश्रद्धेचा बाजार मांडला आहे. असाच काहीसा एक प्रकार नागपुरात उघडकीस आला. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी शहरातील एका ढोंगीबाबाचा पर्दाफाश केला आहे. आपल्या दैवी शक्तीने कोरोनासारखा आजार बरा होतो, असा दावा या ढोंगीबाबाने केला होता. मात्र, त्याचे अंधश्रद्धेचे सर्व कारस्थान पोलिसांनी उळधून लावले
पोलिसांनी गुणवंत बाबा (खरं नाव शुभम तायडे) या ढोंगीबाबास जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत अटक केली आहे. या ढोंगीबाबाविरोधात लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पंचशीलनगरात राहणाऱ्या ढोंगीबाबा शुभम तायडे नामक गुणवंतबाबाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच कार्यकर्ते आणि पोलिसांच्या चमूने सापळा रचून त्याच्या दुष्कृत्याचा भंडाफोड केला
बाबा दैवी शक्तीने पैशाचा पाऊस पाडतो, सट्ट्याचा नंबर देतो, गुप्तधन शोधतो, आजार दूर करतो, भक्तांच्या घरातील भानगडी दूर करतो आणि स्वप्नात येऊन समस्यांचे निवारण करतो, असा दावा बाबाचे भक्त करत होते. त्याअनुषंगाने पोलिसांनी पंचशीलनगर येथे सापळा रचत बाबाच्या दरबारात धाड टाकली. विशेष म्हणजे, राज्यात टाळेबंदीबाबतचे कठोर निर्बंध असतानाही यावेळी तेथे 50 पेक्षा जास्त भक्तमंडळी गर्दी करून होते.
यावेळी बाबाच्या अंगात शेषनाग संचारल्याने तो जमिनीवर सापासारखा आळोखेपिळोखे देत फुसफुस करत होता. मात्र, पोलीस दिसताच त्याचे फुसफुसणे अचानक बंद झाले. बाबा कोरोना संक्रमित रुग्णांना क्षणार्धात कोरोनामुक्त करतो, असे भक्त यावेळी सांगत होते. अशाच तऱ्हेने बाबा लोकांना स्वत:मध्ये दैवी शक्ती असल्याचे सांगून भीती दाखवत होता. मात्र, पोलिसांच्या अचानक झालेल्या उपस्थितीने त्याचा दैवी चमत्कार दूर पळून गेला… 

WhatsAppShare