माझ्यावर हल्ला करणाऱ्या आंदोलकांवर अॅट्रॉसिटी दाखल  करा; हिना गावीत यांची लोकसभेत मागणी

248

नवी दिल्ली,  दि. ६ (पीसीबी) – मी आदिवासी महिला खासदार असल्यानेच जाणीवपूर्वक मलाच लक्ष केले आहे, असा आरोप करून गाडीवर चढून तोडफोड करणाऱ्या आंदोलकांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी  नंदुरबारच्या भाजप खासदार हिना गावित यांनी आज (सोमवार) लोकसभेत केली.  

धुळ्यात डीपीसीच्या मिटींगला रविवार (दि. ५)  इतरही लोकप्रतिनिधी होते. केवळ मला लक्ष्य करण्यात आले. १० ते १५ जणांनी माझ्या गाडीवर  हल्ला केला. तसेच गाडी उलटून टाकण्याचा प्रयत्न केला. मी गाडीतून उतरले नसते, तर माझा मृत्यूही झाला असता,  असे हिना गावित यांनी सभागृहात सांगितले. घटनास्थळी  केवळ ४ पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित होते. मात्र,  त्यांनी या हल्लेखोरांना रोखले नाही. ते केवळ बघत राहिले, असा आरोपही  गावित यांनी केला.

तोडफोड करणाऱ्या १५ आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.  मात्र,  त्यानंतर त्यांना दोन तासाच्या आत सोडून देण्यात आले. हल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या हार तुरे घालून सत्कार करण्यात आला.  असे काय त्यांनी फार मोठे काम केले,  असा संतप्त सवाल  त्यांनी उपस्थित केला.

मी आदिवासी महिला खासदार आहे. माझे संरक्षण पोलीस करु शकणार नाहीत,  तर या राज्यात महिला सुरक्षित आहेत का? या संदर्भात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी हिना गावित यांनी सभागृहात केली.