माझ्यावरील हल्ला म्हणजे मॉब लिंचिंगचा प्रकार – खासदार हिना गावित

165

धुळे, दि. ६ (पीसीबी) – मी गाडीमध्ये बसलेली असताना मला मराठ आंदोलकांनी खेचून गाडी बाहेर काढण्यात आले. मी बाहेर आल्यानंतर काही जण माझ्या मागे आले व त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मला माझा मृत्यू समोर दिसत होता. आंदोलने अनेक प्रकारची होत असतात. मात्र, महिला लोकप्रतिनिधीवर असा हल्ला होणे निंदनीय आहे. हा मॉब लिंचिंगचा प्रकार होता, असा आरोप नंदुरबारच्या भाजप खासदार हिना गावित यांनी केला आहे.

धुळयातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर खासदार हिना गावित यांच्या गाडीवर  रविवार (दि.५) हल्ला करण्यात आला. या घटनेवर हिना गावित यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी खासदार हीना गावित आल्या होत्या. या  बैठकीच्या आधीच   मराठा आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसले होते. बैठक झाल्यानंतर सर्वप्रथम बाहेर आलेल्या खासदार गावित यांना आंदोलकांनी रोखले. त्यांनी आरक्षणाबाबत चर्चा करण्याची मागणी केली. मात्र गावित यांनी त्यास नकार दिल्याने आंदोलकांनी गावित यांच्या गाडीची तोडफोड  केली.

दरम्यान, आज (सोमवार) धुळ्यात खासदार सुभाष भामरे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, अचानक गावित यांची गाडी फोडल्याने या विषयाला हिंसक वळण लागले आहे. राज्यात भाजपाच्या नेत्यांच्या घरांसमोर जाऊन आंदोलन केले जात आहे.