“माझं कुटुंब प्रभू रामाचा मुलगा कुशचं वंशज आहे”- दिया कुमारी

103

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी)-  जयपूरमधील राजघराण्याच्या सदस्य आणि भाजपा खासदार दिया कुमारी यांनी आपण प्रभू रामाचा मुलगा कुशची वंशज असल्याचा दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने रघुवंशातील कोणी अयोध्येत वास्तव्यास आहे का ? अशी विचारणा केली होती. त्यानंतर दिया कुमारी यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी प्रभू रामाचे वंशज संपूर्ण जगभरात असल्याचेही सांगितले आहे. तसेच लवकरच अयोध्येच्या मुद्द्यावर तोडगा काढला जावा अशी मागणी केली आहे.

“न्यायालयाने प्रभू रामाचे वंशज कुठे आहेत अशी विचारणा केली आहे. रामाचे वंशज संपूर्ण जगभरात आहेत. माझं कुटुंबही प्रभू रामाचा मुलगा कुशच वंशज आहे”, अशी माहिती खासदार दिया कुमारी यांनी दिली आहे. आपल्या वक्तव्याला आधार देताना हस्तलिखिते, वंशावली आणि कागदपत्र उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणीदरम्यान अयोध्येत अद्यापही रघुवंशातील कोणी वास्तव्यास आहे का ? अशी विचारणा केली होती. अयोध्या रामजन्मभूमी – बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणात पक्षकार असणाऱ्या ‘राम लल्ला विराजमान’कडे न्यायालयाने ही शंका व्यक्त केली होती.