माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांना अटक करण्याचे न्यायालयाचे आदेश

6014

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – महाबळेश्वर येथे वनसदृश जागेत बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाच्या फरिदाबाद न्यायालयाने माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्यासह ३३ जणांना अटक करण्याचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

निसर्ग आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महाबळेश्वरचा समावेश अतिसंवेदनशील क्षेत्रात केलेला आहे. यामुळे या परिसरातील बांधकामांसाठी कडक नियमावली आहे. वनक्षेत्र किंवा वनसदृश क्षेत्र असलेल्या जागेत कुठलेही नवे बांधकाम करण्यास मनाई आहे. तसेच शेतजमिनींचे अकृषक म्हणून बदल करण्यावरदेखील निर्बंध घातलेले आहेत. असे असताना येथील पालिका, महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून राणे यांच्यासह अन्य ३३ जणांनी येथील वनसदृश मिळकतीमध्ये बेकायदेशीर बांधकामे केली आहेत.

या प्रकरणी येथील ‘बॉम्बे एन्व्हायर्नमेंट अॅक्शन’या संस्थेच्या वतीने हेमा रमाणी यांनी या बांधकामांविरुद्ध फरीदाबाद (नवी दिल्ली) येथील राष्ट्रीय हरित लवादाकडे २०१६ मध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये रमाणी यांनी केंद्र आणि राज्य सरकार, साताऱ्याचे जिल्हाधिकारी, महाबळेश्वरचे तहसीलदार, पांचगणी-महाबळेश्वर पालिकांना प्रतिवादी केले आहे. या तक्रारींची गंभीर दखल घेत लवादाने या बांधकामांची चौकशी करण्याचे आदेश वन विभाग, भूमी अभिलेख विभाग, महाबळेश्वर तहसीलदार यांना दिले. या विभागांच्या संयुक्त चौकशी समितीने ही सर्व बांधकामे बेकायदेशीर असून ती वनसदृश जमिनीवर झाल्याचा अहवाल नुकताच न्यायालयाला सादर केला.

या अहवालाच्या आधारे न्यायालयाने नीलम राणे यांच्यासह ३३ जणांविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. तसेच या सर्वांच्या अटकेचे आदेश काढले आहेत. या सर्वांना घेऊन ३० जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश बजावण्यात आल्याचे महाबळेश्वरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले. या आदेशामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

यांना अटक करण्याचे न्यायालयाचे आदेश

अटक आदेश बजावण्यात आलेल्यांमध्ये नीलम राणे यांच्यासह प्रल्हाद नारायणदास राठी (क्षेत्र महाबळेश्वर), महेश बाबुलाल पांचाळ, सलीम उस्मान वाईकर, चांद मोहम्मद वाईकर (नाकिंदा) शिरीष मधुसूदन खैरे, खुशद इस्माईल अन्सारी, सदानंद महादेव करंदीकर, विठ्ठल बाबु दुधाणे (भौसे), डॉ. सुनीला मोहन रेड्डी (मेटगुताड), पूजा गजानन पाटील (अवकाळी), संग्रामसिंह आप्पासाहेब नलावडे (भेकवली), मनीषा संतोष शेडगे (शिदोळा), आसावरी संजीव दातार (दरे), आर्ची डॅनियल डिसोजा, खेमाजी नादजी पटेल, अतुल चिंतामणी साळवी, संदीप नंदकुमार साळवी, चंद्रशेखर चंद्रकांत साबणे, कुसुम प्रताप ओसवाल, मोलू लेखराज खोसला व राजन भालचंद्र पाटील (मेटतळे), शंकरलाल बच्चुभाई भातुथा (दुधोशी घोगलवाडी), मनोहर रामचंद्र शिंदे , संतोष हरीभाऊ जाधव, गिनात्री अशोक भोसले (कुभरोशी).