माजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी होते – पंतप्रधान मोदी

211

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी हे दलितविरोधी होते, दलितांना हक्क मिळू नये, यासाठी त्यांनी संसदेत मोठमोठी भाषणेही केली आहेत. हे सर्व नोंद झाले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे. तर भाजप हा एकमेव पक्ष आहे, जो दलितांच्या उद्धारासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाहीही मोदी यांनी यावेळी दिली.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोदी बोलताना म्हणाले की, मंडल कमिशनच्या विरोधातील राजीव गांधींचे भाषण आजही उपलब्ध आहे. काँग्रेस आणि तिसऱ्या आघाडीने १९९७ मध्ये बढतीमधील आरक्षण रद्द केले होते. तर भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वायपेयी यांनी एससी, एसटी समाजाला न्याय दिला होता. गेल्या काही दिवसांपासून मॉब लिंचिंग, एससी-एसटी कायद्यातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यावरून राजकारण सुरु आहे, असा आरोप मोदी यांनी केला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला एससी-एसटी समुदायाची मत मिळू नये, यासाठी विरोधकांनी महाआघाडीची रचना केली आहे, असा आरोप मोदींनी केला आहे. तसेच जेव्हा निवडणूक येते त्याचवेळी या पक्षांना या समुदायाची आठवण येते, असेही मोदी म्हणाले. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये आधीच काँग्रेसने आपला पराभव मान्य केला आहे. तिन्ही राज्यात आमच्याकडे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. या राज्यातील भाजपची कामगिरी चांगली आहे, येथील जनता पुन्हा एकदा भाजपला विजयी करेल, असे मोदी म्हणाले.