माजी खासदार संभाजीराव काकडे यांचं वृद्धापकाळाने निधन

175

पुणे, दि. १० (पीसीबी) – जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकार तज्ज्ञ माजी खासदार संभाजीराव काकडे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं, ते 89 वर्षांचे होते. एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात लाला नावानं प्रसिद्ध असणारे संभाजीराव काकडे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर विरोधक मानले जात होते. पण राजकारणाबाहेर शरद पवार आणि संभाजीराव काकडे चांगले मित्र होते.

संभाजीराव हे पहिल्यांदा 1971 मध्ये विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार झाले. त्यावेळचे काँग्रेसचे मातब्बर रंगराव पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता. ही निवडणूक काकडे यांनी अपक्ष म्हणून लढविली होती. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पाटलांना साथ असताना देखील त्यांनी ही निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 1978 तसेच 1982 साली ते बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. “माजी खा. संभाजीराव काकडे यांच्या निधनाने बारामतीतील मातब्बर राजकीय व्यक्तिमत्व हरपलं आहे. जनता दलाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकला. नव्या नेतृत्वाला दिशा देण्याचं कार्य निष्ठेनं केलं. शोकमग्न कुटुंबीयांप्रती सहसंवेदना. भावपूर्ण आदरांजली!”, अशा शब्दात शरद पवार यांनी श्रद्धांजली अर्पित केली आहे.

दरम्यान, काही काळानंतर संभाजीराव काकडे राजकारणातून अलिप्त झाले होते. पण काही नेत्यांना ते नेहमी मार्गदर्शन करत होते. संभाजीराव काकडे त्यांच्यामागे पत्नी आणि 3 मुलं असा परिवार आहे.

WhatsAppShare