माजी आमदार बाबुराव पाचार्णे यांच्या भेटीला देवेंद्र फडणवीस

293

शिरूर, दि. १० (पीसीबी) : माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यावर प्रकृतीअस्वास्थामुळे उपचार चालू असताना, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील रूग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. पाचर्णे यांच्या कुटूंबियांचीही त्यांनी भेट घेतली व पाचर्णे लवकर बरे होतील, अशा सदीच्छा व्यक्त केल्या.

शिरूर मधील खासगी रूग्णालयात पाचर्णे यांच्यावर उपचार चालू आहेत. आज रात्री साडेनऊच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार भीमराव तापकीर, राहुल कुल, माधुरी मिसाळ, सुनिल कांबळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्यासमवेत त्यांची भेट घेतली. आमदार ॲड. अशोक पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, दादा पाटील फराटे यावेळी उपस्थित होते. या भेटीनंतर फडणवीस यांनी पाचर्णे यांच्या पत्नी मालती, मुलगा राहुल, मुलगी राणीताई, सून मेघना व पाचर्णे यांच्या बहिणींचीही आवर्जून भेट घेतली. पाचर्णे यांचे पक्षकार्यात व एकूणच समाजकारणात मोठे योगदान असून, आम्ही तुम्हा कुटूंबियांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत, अशा शब्दांत फडणवीस यांनी पाचर्णे कुटूंबियांना दिलासा दिला.

पाचर्णे हे लवकरात लवकर आजारातून बरे होतील आणि विकासकामांमध्ये कार्यरत होतील, असा विश्वास फडणवीस यांनी पाचर्णे यांच्या येथील संपर्क कार्यालयाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांसमोर बोलतना व्यक्त केला. ते म्हणाले, जनतेचा नेता म्हणून पाचर्णे यांनी या भागातील समाजासाठी कार्यकर्त्याप्रमाणे काम केले. त्यांनी जीवनात अनेकांचे भले केले, अनेकांत सकारात्मकता निर्माण केलेली असल्याने ते देखील आजारावर मात करून लवकरच बरे होतील.

आता राज्यात आमचे सरकार आले असल्याने, पाचर्णे हे पुन्हा पूर्वीप्रमाणे बरे होऊन कार्यरत होतील आणि शिरूर तालुक्यातील विकासकामांसाठी माझ्याकडे, चंद्रकांतदादांकडे आग्रह धरतील. आम्ही देखील त्यांचा विकासकामांचा आग्रह पूर्णत्वास नेऊ. दरम्यान, आज दुपारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तर काल माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, युवा उद्योगपती प्रकाश धारिवाल यांनीही पाचर्णे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.