माचिस न दिल्याने मारहाण; तिघांना अटक

70

दिघी, दि. ११ (पीसीबी) – एकाच कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्याला एकाने माचिस मागितले. माचिस देण्यासाठी दुसऱ्या सहका-याने नकार दिला. त्यावरून माचिस न देणाऱ्या तरुणासह त्याचा मित्र आणि कंपनीतील सुरक्षारक्षकांना चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 10) रात्री मॅगझीन चौकाजवळ, दिघी येथील एस्क्वेअर कंपनी डायनामिक लॉजिस्टिक कुरिअर कंपनीच्या गेटवर घडली.

अर्जुनकुमार लवकुश केवट (वय 21, रा. भारतमातानगर, दिघी. मूळ रा. नेपाळ), संदीप सहदेव निसाद अशी जखमींची नावे आहेत. याबाबत अर्जुनकुमार यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहेत.

सुंदर पंढरीनाथ गवळी (वय 19), अनिकेत हेमराज वाणी (वय 23), गणेश प्रदीप लोंढे (वय 24) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह त्यांचा चौथा साथीदार अवि कळसे (वय 20) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी सुंदर हे मॅगझीन चौकाजवळ असलेल्या डायनामिक लॉजिस्टिक कुरियर कंपनीत काम करतात. सोमवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास आरोपी सुंदर याने फिर्यादी यांचे मित्र संदीप यांना माचीस मागितले. संदीप यांनी माचिस दिले नाही. या कारणावरून आरोपींनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यांचे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी आले असता त्यांना देखील लाकडी दांडक्याने गुडघ्यावर आणि पायावर मारहाण केली. त्यानंतर कंपनीतील सुरक्षारक्षक हे भांडण सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी सुरक्षारक्षकांना देखील मारहाण केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare