मागास जाती प्रवाहात येईपर्यंत आर्थिक निकषांवर नोकऱ्या आणि शिक्षणांमध्ये  आरक्षण नको- अशोक चव्हाण

1657

मुंबई, दि.२७ (पीसीबी) – मागासलेल्या जाती जोपर्यंत मुख्य प्रवाहात येत नाहीत, तोपर्यंत आर्थिक निकषांवर नोकऱ्या आणि शिक्षणांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेणे योग्य होणार नाही, असे ठाम मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या उभारणीला गती मिळावी म्हणून ते वाराणसीला जाणार असल्याची पोस्टर्स झळकली आहेत. याचा अर्थ ठाकरे हे हिंदुत्वाकडे वळत असून निवडणूका जवळ आल्याचे ते चिन्ह आहे. राफेल विमान खरेदी प्रकरणी मोदी सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षेची ढाल पुढे करून वास्तव सांगण्याचे सरकार टाळत आहे. काँग्रेस सरकारने एका राफेल विमानाची किंमत ५२६ कोटी रुपये निश्चित केली होती. मात्र, मोदी सरकारने तेच राफेल विमान १६०० कोटी रूपयांना खरेदी केले. गोपनीयतेच्या नावाखाली संरक्षण मंत्री आणि पंतप्रधान हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. तांत्रिक विषयांसंदर्भात गोपनीयता ठीक आहे. मात्र किंमतीविषयीसुद्धा गोपीनियता असावी, असे फ्रान्सबरोबर राफेल विमान खरेदीसंदर्भात झालेल्या करारात कुठेही म्हटलेले नाही, असा दावाही चव्हाण यांनी केला.