मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतरच विशेष अधिवेशन बोलावणे  योग्य – मुख्यमंत्री

209

मुंबई, दि. ३० (पीसीबी) –  मराठा समाजाला आरक्षण  देण्याबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल  आल्यानंतरच विधीमंडळाचे विशेष अधिवेशन  बोलावणे, योग्य ठरेल,  असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.  मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने  सध्या कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यांतील सर्व पक्षीय आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट  घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी  कोल्हापूर जिल्हयातील आंदोलकांच्या भावना समजून घेतल्या.  

कोल्हापुरातील आंदोलकांनी सर्वपक्षीय आमदार, खासदार यांची बैठक बोलावली होती. यावेळी  सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती. तसेच येत्या ४ सप्टेंबर रोजी कोल्हापूर ते मुंबई असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सर्वपक्षीय आमदार व खासदारांना करण्यात आले  होते.

आंदोलकांच्या या भावना आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितल्या. त्यावर   मुख्यमंत्री म्हणाले की,  लोकप्रतिनिधी या नात्याने आंदोलकांच्या भावनेचा विचार  केला जाईल.  आंदोलकांनी शांततामय मार्गाने आंदोलन करून सामंजस्याची भूमिका  घ्यावी, असे आंदोलकांना सांगा. दरम्यान, आम्ही कोल्हापूरला गेल्यानंतर आंदोलकांपर्यत आपला संदेश पोहचवू, असे  आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.