मागासवर्गातील महिलेला स्थायी समिती अध्यक्ष होण्यापासून रोखण्याचा राष्ट्रवादीचा डाव उधळला

84

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या निवडणुकीत मागासवर्गीय महिलेचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीने जंग जंग पछाडले. परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. भाजपने एकी दाखविल्यामुळे राष्ट्रवादीचा डाव उधळला. राष्ट्रवादीची सत्ता असताना मागासवर्गीय नगरसेवकांना स्थायी समितीचे साधे सदस्यपद सुद्धा दिले जात नव्हते. आता एक मागासवर्गीय महिला अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा असताना त्यात राष्ट्रवादीने आपला उमेदवार उभा करून पराभव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राष्ट्रवादीविषयी मागासवर्गीय समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

स्थायी समिती म्हणजे महापालिका तिजोरीची चावी समजली जाते. या समितीत सर्व आर्थिक निर्णय घेतले जातात. त्यामुळे स्थायी समितीचे सदस्यत्व मिळावे, अशी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची इच्छा असते. तसेच स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाल्यास संबंधित नगरसेवकाची राजकीय कारिकीर्द बहरते. परंतु, महापालिकेतील आतापर्यंतचे राजकारण पाहिल्यास मागासवर्गीय नगरसेवकांना या समितीपासून जाणूनबूजून लांब ठेवण्याचे राजकारण केले गेले. एखाद दुसरा मागासवर्गीय नगरसेवक सोडल्यास आतापर्यंत निवडून आलेल्या किती मागासवर्गीय नगरसेवकांना स्थायी समितीचे अध्यक्ष केले गेले, हा संशोधनाचा विषय होईल.

परंतु, भाजपने आतापर्यंतच्या या मागासवर्गविरोधी राजकारणाला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रथमच सत्ताधारी बनलेल्या भाजपने पहिल्या वर्षी सीमा सावळे या मागासवर्गातील ज्येष्ठ नगरसेविकेला थेट स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले. त्यांची एक वर्षांची कारकिर्द संपताच दुसऱ्या वर्षीही ममता गायकवाड या मागासवर्गीय नगरसेविकेला स्थायीचे अध्यक्ष बनविले. सीमा सावळे या कणखर राजकारणी असल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीला विरोध करता आला नाही. परंतु, ममता गायकवाड या प्रथमच निवडून आलेल्या नगरसेविका असल्यामुळे त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळू द्यायचे नाही, असा चंगच राष्ट्रवादीने बांधला होता.

राष्ट्रवादीने स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणूक मैदानात नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांना उतरविले. ते स्थानिक असल्यामुळे राष्ट्रवादीने भाजपचे नगरसेवक फोडण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या उमेदवार मागासवर्गातील असल्याचा प्रचार करण्यात आल्याचे समजते. तसेच भाजपचे नगरसेवक फोडण्यासाठी राष्ट्रवादीने कोट्यवधींचे आमिषही दाखविले. परंतु, राष्ट्रवादीच्या या रणनितीला भीक न घालता भाजपच्या नगरसेवकांनी एकी दाखविली. त्यामुळे एका मागासवर्गीय महिलेचा पराभव करण्याचा राष्ट्रवादीचा डाव उधळला. परंतु, या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस ही राजकारणात मागासवर्गीयांना समान संधी देण्याच्या विरोधात असल्याचा संदेश गेला आहे.

राष्ट्रवादीच्या आतापर्यंतच्या या कुटिल राजकारणामुळे शहरातील मागासवर्ग समाजातील एकाही राजकीय व्यक्तीला राजकारणात मोठे होता आले नाही. राजकारणात मागासवर्गीय समाजाचे खच्चीकरण करण्याचेच काम राष्ट्रवादीने केले. जगदीश शेट्टी यांच्यासारख्या खुल्या प्रवर्गातील व्यक्तीला मागासवर्गासाठी राखीव जागेवर उभे करून नगरसेवक म्हणून निवडून आणले. राष्ट्रवादीने जगदीश शेट्टी यांच्या आडून एका मागास समाजातील व्यक्तीला नगरसेवक होण्यापासून वंचित ठेवल्याची भावना शहरातील मागासवर्ग समाजात निर्माण झाली होती. आता स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मागासवर्ग समाजातील महिलेचा पराभव करण्याचा राष्ट्रवादीचा डाव फसला. परंतु, अशा राजकीय डावामुळे राष्ट्रवादीबाबत शहरातील मागासवर्गीय समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.