माओवाद्यांचे थिंक टॅक समजल्या जाणाऱ्या संशयितांच्या घरावर पुणे पोलिसांचे छापे

173

पुणे, दि. २८ (पीसीबी) – पुण्यातील शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसे पुरविल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे, अॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रॉनी विल्सन आणि प्रा. शोमा सेन यांना अटक केली होती. त्यांच्याकडे सापडलेल्या २०० ई-मेलमध्ये या पाच जणांचा बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याचे दिसून आले.

पुणे पोलिसांनी त्याआधारे आज (मंगळवारी) एकाच वेळेस हैदराबाद, मुंबई, दिल्ली तसेच छत्तीसगडमध्ये माओवादीचे थिंक टॅक असलेल्या संशयित इसमांच्या घरावर छापा टाकला असून त्याची झडती घेण्याचे काम सुरु आहे. यामध्ये वरावरा राव (हैदराबाद), वेरनोन गोन्सालविस, अरुण पाररिया (मुंबई), सुधा भारद्वाज (छत्तीसगड), गौतम नवलाखा यांचा समावेश आहे. माओवाद्यांशी संबंध असल्याने व एल्गार परिषदेशी संबंधित असलेल्यांना यापूर्वी अटक केली असली तरी आता ज्यांच्या घराची झडती घेतली जात आहे, त्यांची एल्गार परिषद अथवा कोरेगाव भीमा दंगलीशी संबंध नसून ते बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंधित असल्याचे उघड झाल्याने त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.