माऊलींच्या अश्वाचे पुणे मुक्कामात ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन

74

पुणे, दि. ८ (पीसीबी) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींच्या अश्वाचे आज (रविवारी) सकाळी सातच्या सुमारास ह्रदय विकाराच्या झटक्याने दुखद निधन झाले. अश्वाचे नाव हिरा असे होते. मागील आठ वर्षापासून हा अश्व माऊलींच्या वारीत सेवा देत होता. वारीच्या वाटेवरच अश्वाने अखेरचा श्वास घेतला.

आळंदीहून काल (शनिवारी) ७ जुलैला पालखीसह अश्वांनी प्रस्थान केले होते. ३० किलोमीटर अंतर चालून अश्व काल रात्री पुणे येथे मुक्कामी पोचले होते. आज (रविवारी) सकाळी ही दुखद घटना घडली. ही माहीती बाङेर येताच वारकऱ्यांमध्ये दुखाची छटा पसरली आहे.

अश्वाचे मृत्यूसमयी वय बारा ते तेरा वर्षाचे होते. पालखी प्रस्थान दिवशी तो श्रीमंत शितोळे सरकार यांच्या अंकली जिल्हा बेळगांव या गावावरून माऊलीच्या सेवेत दाखल झाला होता. त्याने आळंदी ते पुणे असा ३० किलोमीटरच्या वाटचालीत माऊलीची सेवा प्रामाणिकपणे पार पाडली. दरम्यान, पालखी सोहळ्यासाठी नवीन अश्वाचे आगमन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.