महेश मांजरेकर काँग्रेसमध्ये आले, तर आनंदच होईल – अशोक चव्हाण

401

कोल्हापूर, दि. १ (पीसीबी) – अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची आज (शनिवार) कोल्हापुरात भेट घेतली. या भेटीनंतर मांजरेकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. याबाबत चव्हाण यांना विचारले असता मांजरेकर काँग्रेसमध्ये आले तर आनंदच होईल, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मांजेरकर  पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा करत आहेत. या सिनेमाच्या  शूटिंगसाठी ते कोल्हापुरात आले होते. तर काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त अशोक चव्हाण  कोल्हापुरात आले आहेत.  या दोघांमध्ये बराच वेळ अनौपचारिक गप्पा झाल्या. महेश मांजरेकरांनी काही महिन्यांपूर्वीच मनसेला रामराम केला. त्यानंतर ते कुठे जाणार? असा प्रश्न विचारला जात होता. ते काँग्रेसमध्येच जातील, अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती.

या पार्श्वभूमीवर मांजरेकर यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याने ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे   अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. मांजरेकर हे स्टार अभिनेते आहेत, ते जर काँग्रेसमध्ये आले तर त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागतच आहे, असे सूचक वक्तव्य चव्हाण यांनी केले. तर याबाबत मांजरेकर यांची कोणतीही प्रतिक्रिया समजू शकलेली नाही.