महिला बार काऊंसिल अध्यक्षाचा सत्र न्यायालयाच्या आवारात गोळ्या घालून खून

185

आगरा, दि. १२ (पीसीबी) – उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला बार काऊंसिल अध्यक्षाची आगरा येथील सत्र न्यायालयाच्या आवारात सहकार्यानेच गोळ्या झाडून खून केला. त्यानंतर स्वत: वर ही गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

दर्वेश यादव (वय ३८) असे खून झालेल्या बार काऊंसिलच्या महिला बार अध्यक्षाचे नाव आहे. तर मनिष शर्मा असे हल्लेखोराचे नाव असून तो दर्वेश यांचा सहकारी वकील आहे.

प्राप्त माहितीनुसार, दर्वेश यादव यांची दोनच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश बार काऊंसिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. आगरा कोर्टातील कार्यालयात त्यांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर ही घटना घडली. मनिष शर्मा याने गोळीबार केल्यानंतर दर्वेश यांचा जागीच मृत्यू झाला.  आगराचे पोलीस उपमहानिरीक्षक अजय आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनिष याने दर्वेश यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यात दर्वेश यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने स्वत:वरही गोळी झाडली. यात मनिष गंभीर झाला असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.