‘महिला अत्याचारांबाबत पंतप्रधान गप्प का?’- सुप्रिया सुळे

108

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – पुरोगामी भारतात महिलांवरील अन्याय-अत्याचार व बलात्काराच्या घटना वाढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने मुलींच्या शिक्षण, सुरक्षिततेबाबत बोलत असतात. मग त्यांच्याच सरकारमध्ये अशा घटना का घडत आहेत. याबाबत ते मौन बाळगून का आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी उपस्थित केला. हरयाणात मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचाही त्यांनी यावेळी तीव्र शब्दांत निषेध केला.

हरयाणातील सुशिक्षित घरातील मुलगी शिक्षणासाठी आली होती. तिच्यावर सामूहिक बलात्कार होतो. या घटनेचा आपण सगळ्यांनी जाहीर निषेध करायला हवा. महाराष्ट्रातही सातत्याने मुलींची छेडछाड, बलात्कार अशा घटना घडत आहेत. मुंबईमध्ये अपहरण होऊन बेपत्ता होणाऱ्या मुलींची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारच्या गुन्हे अहवालात अडीच ते तीन हजार मुली बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे. याचे उत्तर कोण देणार आहे, असा सवाल सुळे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रिपद आहे. त्यांच्या पक्षाचे आमदार मुलींचे अपहरण करून उचलून नेण्याची भाषा करतात. त्यावर मुख्यमंत्र्यांनी चकार शब्दही काढला नाही. हे या सरकारचे अपयश आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.