महिलाबाबत संघाची आणि भाजपची विचाराधारा संकुचित – राहुल गांधी

37

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – देशाचा कारभार महिला चालवू शकत नाहीत, महिला नेतृत्त्व करू शकत नाहीत, अशी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपची धारणा आहे. त्यामुळेच महिलांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. संघाची आणि भाजपची विचारधाराच संकुचित आहे. महिला कायम पुरूषांच्या मागे राहाव्यात असेच भाजप आणि संघाला वाटते आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवार) येथे केली.

दिल्लीत महिला काँग्रेसच्या संमेलनात राहुल गांधी बोलताना म्हणाले की, महिला सक्षमीकरणाबाबत भाजप आणि संघाची विचारधारा वेगळी आहे. आगामी काळात काँग्रेस पक्षात महिलांना ५० टक्के स्थान असेल, असेही त्यांनी सांगितले. ज्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना स्थान देण्यात येईल, त्यादिवशी आरएसएस आरएसएस राहणार नाही, म्हणूनच ते महिलांना अकार्यक्षम मानून दुय्यम स्थान देत आहेत, असेही राहुल गांधी  म्हणाले.

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने या सरकारने कोणती पावले उचलली? असा सवाल करत राहुल गांधी यांनी संघ आणि भाजपवर हल्ला चढवला. संघ आणि भाजपमधील लोकांचा विश्वास पुरूष प्रधान संस्कृतीवरच आहे. त्यांना महिलांनी पुढे यावे, नेतृत्त्व करावे, असे त्यांना अजिबात वाटत नाही, अशीही टीका राहुल गांधी यांनी केली.