महिंद्रांचा दिलदारपणा, केरळच्या ‘बाहुबली’ला लॅविश मराझो भेट

1144

मुंबई, दि. १२ (पीसीबी) –  संवेदनशील मनाचा, समाजभान असणारा आणि औदार्य दाखवणारा दिलदार व्यावसायिक म्हणून आनंद महिंद्रा परिचीत आहेत. त्याचा परिचय पुन्हा एकदा आला आहे. पाऊस आणि पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळमध्ये अनेकांना वाचवणाऱ्या मच्छिमार जैसलला, आनंद महिंद्रा यांनी नुकतीच लाँच झालेली महिंद्र मराझो ही लॅविश कार भेट दिली आहे.

यापूर्वी देशाने आनंद महिंद्रा यांचे दातृत्व पाहिले आहे. शौर्य, धाडस, समाजभान आणि कर्तृत्व दाखवणाऱ्यांचा गौरव आनंद महिंद्र नेहमीच करत आले आहेत. त्यांनी केरळमधील एका मेहनती रिक्षाचालकाला महिंद्रा सुप्रो मिनी ट्रक दिला होता. इतकेच नाही तर कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूलाही त्यांनी महिंद्राची TUV300 ही भारदस्त गाडी दिली होती.

त्यानंतर आता आनंद महिंद्रांनी मच्छिमार असलेल्या जैसलला बक्षीस म्हणून नवी कोरी महिंद्र मराझो भेट दिली आहे. केरळमधील कालिकत इथे केरळच्या कामगार मंत्र्यांच्या हस्ते ही कार जैसलला सोपवण्यात आली.