महाराष्ट्राला पावसासाठी आठवड्याभराची प्रतीक्षा – हवामान विभाग

86

पुणे, दि. १६ (पीसीबी) – जोरदार पावसासाठी महाराष्ट्राला अजून आठवड्याभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हा  आठवड्याही महाराष्ट्रातील अनेक भागात कोरडा गेला आहे.  

महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर कोकणसह दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली होती. मात्र, यंदा मान्सून वेळेत दाखल झाला असला तरी त्याचा जोर आठवडाभरही कायम राहिलेला नाही.

महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पेरणीच्या तयारीत असलेले शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत. जूनचा मध्यान्ह झाला तरी  पश्चिम आणि मध्य भारतात मान्सून दाखल झालेला नाही. ११ जून पासून मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आहे.

येत्या आठवडाभरात कोकण आणि गोव्यात तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील आठवडाभर महाराष्ट्रातील अन्य भागात पावसाची कोणतीही शक्यता नाही, असे हवामान खात्याच्या पुणे विभागाने म्हटले आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाड्यात ढगाळ वातावरण कायम राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.