महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव ? पाच जिल्हे प्रभावित

1

अहमदपूर (जि. लातूर) : तालुक्यातील केंद्रेवाडी येथील ३५० गावरान कोंबड्या काल सकाळी अचानक दगावल्या. त्यामुळे नागरिकांना धास्ती बसली असून, पशुवैद्यकीय पथकाने पाहणी करून मृत कोंबड्यांचे नमुने घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. कोंबड्या कशामुळे दगावल्या, हे मात्र अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल, असे सांगितले.

लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी येथील सदाशिव केंद्रे यांनी दोन महिन्यांपूर्वी अहमदनगर येथून ८०० गावरान कोंबड्यांचे पक्षी आणले होते. त्याचे संगोपन ते करत होते. दरम्यान, शनिवारी सकाळी अचानक त्यातील ३५० कोंबड्यांनी माना टाकल्या. सदरील कोंबड्या दगावल्याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी प्रभोदयमुळे घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

तसेच परभणीच्या मुरुंबा गावात अचानक 900 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पशुसंवर्धन विभागाने गावात भेट देऊन मृत पक्षांचे नमुने पुण्याला पाठवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. दरम्यान याचा संसर्ग वाढू नये म्हणून मुरुंबा आणि आसपासच्या 5 किलोमीटर परिसरात कुक्कुट विक्रीवर प्रशासनाने बंदी घातली आहे. अहवाल आल्यानंतरच कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल.

पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे २६ कावळे मृतावस्थेत आढळून आले
मुगगाव येथे दोन दिवसांत २६ कावळे मृतावस्थेत आढळून आले. सुरुवातीला ग्रामस्थांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र अनेक कावळे मृत्युमुखी पडलेले दिसल्यानंतर ग्रामस्थांनी सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे प्रमुख सिद्धार्थ सोनवणे यांना माहिती दिली. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर अधिकाऱ्यांचे पथक गावात दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून कावळ्यांचे मृत अवशेष ताब्यात घेतले.

WhatsAppShare