महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे

76

बारामती, दि. ६ (पीसीबी) – महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे, हे त्या पक्षाने लक्षात ठेवावे व त्या आमदारानेही लक्षात ठेवावे, असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (गुरूवार) दिला.

इंदापूर दौऱ्यावर सुप्रिया सुळे आल्या असून हिंगणगाव येथील एका जाहीर सभेत त्या  बोलत होत्या. यावेळी त्यांनी राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुरोगामी महाराष्ट्रात सत्तेत असणारा एक आमदार जर महिलांना व मुलींना पळवून नेण्याची भाषा करत असेल, तर यासारखा काळा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात नाही. याचा मुख्यमंत्र्यांनी जाहीर निषेध करायला पाहिजे. त्यांनी स्वतः या विषयावर दिलगिरी व्यक्त करायला हवी होती. नाहीतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांना झेपत नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, महिलांच्या सुरक्षेचे काय करायचे, ते आम्ही बघू, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.