“प्रमुख नेत्यांचा एकेरी उल्लेख करायला तुमचं कर्तृत्व काय?”; राऊतांकडून पडळकरांचा खरपूस समाचार

97

मुंबई, दि.२५ (पीसीबी) : सध्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला दिवसेंदिवस वेगळं वळण मिळत आहे. ऐतिहासिक पगारवाढीनंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. त्यावर आज संजय राऊत यांनी मीडियापुढे त्यांची प्रतिक्रीया दिली. यावेळी त्यांनी कामगारांनी समजून घ्यायला हवं, असं आवाहन केलं. तर त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनाही चांगलंच खडसावलं आहे. “महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांबद्दल कामगारांसमोर, मीडियासमोर एकेरी उल्लेख करता तुमचं कर्तृत्व काय आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा खरपूस समाचार घेतला आहे. कामगारांचे नेते संप चिघळवत असतील तर ते कामगारांसाठी चांगलं नव्हे, असंही संजय राऊत यांनी म्हंटल आहे.

परिवहनमंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली. या संपातून तोडगा काढण्यासाठी, एसटी कर्मचाऱ्यांना पाठबळ मिळावं म्हणून एक छान पॅकेज दिलं आहे. परिवहन मंत्र्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. साधारणपणे कमीतकमी 5 हजार रुपये पगार वाढले आहेत. याची तरतूद राज्य सरकार करणार आहे. कामगारांचे नेते आणि त्यांना पाठबळ देणारे राजकीय पक्ष हा संप चिघळवत ठेवणार असतील तर ते हजारो कामगारांच्या कुटुंबाचं नुकसान करत आहेत. एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का? असं करु नका. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री, आम्ही सगळे लोक कामगारांच्या बाबतीत संवेदनशील आहोत. कामगांरांच्या लढ्यातून मंबई आम्हाला मिळाली.

राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसून सुद्धा पॅकेज देण्यात आलं आहे. कामगार समजूतदार आहेत.महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांबद्दल त्या कामगारांसमोर, मीडियासमोर एकेरी उल्लेख करता तुमचं कतृ्त्व काय आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली. कामगारांचे नेते संप चिघळवत असतील तर ते कामगारांसाठी चांगलं नव्हे, असंही संजय राऊत म्हणाले. संप सुरु करणारे दोन्ही नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आंदोलन थांबवायचा निर्णय घेत असतील तर कुठं थांबायचं हे त्यांना समजत असेल तर त्यांचं स्वागत करतो, असं संजय राऊत म्हणाले. संप मागं घेण्याची भूमिका असेल तर चांगलीच आहे, असंही ते म्हणाले.

WhatsAppShare