महाराष्ट्राच्या इतिहासातून सर्वांनी बोध घेतला पाहिजे – अमरजीत पाटील

61

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) –  महाराष्ट्र हा महापुरुषांचा, समाजाला दिशा देणाऱ्या समाजसुधरकांचा आहे. आजपर्यंत शिवरायांसारखा इतिहास कोणी घडवू शकलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या अलौकिक इतिहासातून आपण सर्वांनी बोध घ्यायला हवा, असे मत संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष आणि जेष्ठ विचारवंत अमरजीत पाटील यांनी व्यक्त केले.

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने चिंचवड येथील शाहुनगर पिरॅमिड हॉलमध्ये शनिवारी मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, मुख्य समन्वयक शांताराम कुंजीर, संघटक रमेश हांडे, पिंपरी-चिंचवड महापलिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. या मेळाव्यात पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडची नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. संघटनेचे जिल्हाअध्यक्ष विशाल तुळवे यांच्या हस्ते पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पद नियुक्ती करण्यात आली.

अमरजीत पाटील म्हणाले, “मेंदूच्या टिपऱ्या उडाल्या पाहिजेत. एवढी ताकद ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. शिवजयंती साजरी करणे हे प्रत्येक भक्ताचे कर्तव्य आहे. शिवरायांसारखा इतिहास अन्य कोणी घडवू शकलेला नाही. महाराष्ट्र हा महापुरुषांचा आहे. राज्यात, देशात परस्थिती भयानक आहे. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांची हत्या झाली. पुण्यात महात्मा फुलेंचा पुतळा बसवू शकले नाहीत. सत्यशोधक समाजाचा विस्तार संभाजी ब्रिगेडने केला. पुरंदरेंना कितीही सन्मान देवू द्या. आपण छत्रपती शाहू महाराजांचे कर्तृत्त्व घरोघरी पोहचविले पाहिजे. सार्वजनिक विज्ञानाचा वापर झाला पाहिजे. उद्योगाच्या क्षेत्रात पुढे गेले पाहिजे. अनेक क्षेत्रात बाहेरच्या देशात संधी आहेत. फुले, शाहू, आंबेडकर, भाऊराव पाटलांची विचारधारा पुढे चालविली पाहिजे.”

प्रास्ताविक करताना पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे म्हणाले, “आजचा समाज विस्कटलेला आहे. संतांची आणि समाज सुधारकांची भूमी असलेल्या महाराष्ट्राने नेहमीच सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला आहे. राजर्षि शाहू महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समता, संघर्षाचा झंझावात महाराष्ट्रातून सुरू होऊन देश व्यापला गेला आहे. सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, सहकार अशा विविध क्षेत्रात चौफेर प्रगती करणारा महाराष्ट्र हा देशासाठी नेहमीच आदर्श उदाहरण ठरला आहे. म्हणून खऱ्या अर्थाने संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांचे योगदान महत्वाचे आहे.”

अण्णा बोदडे, शिवश्री डावकर, प्रमोद गोतारने, गणेश दहिभाते, संजय वाजगे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बोत्रे यांनी केले. सुधीर पुंडे यांनी आभार मानले.

संभाजी ब्रिगेडची पुणे जिल्हा कार्यकारणी

शिवश्री डावखर (पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशिक्षण), शिवश्री दहिभाते (पुणे जिल्हा कार्याध्यक्ष उपक्रम), प्रमोद गोतारणे (पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशासन), विशाल जरे (पुणे जिल्हा सचिव), संजय वाजगे (पुणे जिल्हा उपाध्यक्ष जुन्नर), विनायक सावंत (पुणे जिल्हा उपाध्यक्ष मावळ), सोमनाथ गोडसे  (पुणे जिल्हा संघटक),  स्वप्नील तांबे (आंबेगाव तालुका अध्यक्ष),  शिवाजी बोत्रे (जिल्हा संघटक), अविनाश करंजे( जिल्हा संघटक), गणेश गारगोटे (खेड तालुकाध्यक्ष), निलेश कंधारे (मावळ तालुकाध्यक्ष), अजिनाथ मालपोटे  (मावळ तालुका कार्याध्यक्ष, नामदेव पवार (जिल्हा संघटक जुन्नर तालुका), बापुसाहेब कांबळे (जिल्हा संघटक मावळ तालुका), संतोष सोनवणे (खेड तालुका संघटक).