महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता सानेंची नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था

5737

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला हलवण्याची ताकद असलेले महापौर, सत्तारूढ पक्षनेते, विरोधी पक्षनेते ही तीन महत्त्वाची पदे चिखली या एकाच परिसरातील नगरसेवकांकडे आहेत. तरी देखील चिखली परिसराचा फेरफटका मारल्यास शहराच्या अन्य भागात असणारा झोपडपट्टीचा परिसर बरा आहे बुवा, अशी म्हणण्याची वेळ आल्याशिवाय राहात नाही. या तिघांनाही आपल्या परिसरातील साधे रस्तेही स्वच्छ ठेवता येत नाहीत. तरी देखील ते शहर विकासाबाबत मोठमोठ्या बढाया मारण्यात कोणतीही कसर ठेवत नाहीत. त्यामुळे महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची अवस्था “नाचता येईना अंगण वाकडे” या म्हणीसारखी झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महापालिकेतील सर्वोच्च पदांवर बसूनही आपला प्रभाग व्यवस्थित न ठेवणाऱ्यांना शहराच्या विकासाबाबत आश्वासने देण्याचा किंवा विरोधी पक्षनेत्यांना सत्ताधाऱ्यांवर टिका करण्याचा नैतिक अधिकार आहे का?, हा खरा प्रश्न आहे.

“नाचता येईना अंगण वाकडे” ही म्हण आपण खूपदा ऐकतो. आपल्या आजूबाजूला ही म्हण सार्थक करणारे अनेकजण आढळतात. पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्याबाबतही ही म्हण खरी वाटेल, अशी सध्याची परिस्थिती आहे. हे तिघेही सध्या महापालिकेतील सर्वोच्च पदे उपभोगत आहेत. या तिघांच्या बाबतीत दोन बाबींमध्ये साम्य आहे. एक तर हे तिघेही चिखली परिसराचे लोकप्रतिनिधीत्व करणारे आहेत आणि दुसरी बाब म्हणजे या तिघांनीही आपल्या भागात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी काही पावले उचलली आहेत, असे दिसत नाही. महापौर राहुल जाधव हे दुसऱ्यांदा, तर विरोधी पक्षनेते दत्ता साने हे तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून याच भागातून निवडून आले आहेत. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार हे पहिल्यांदाच चिखली भागातून निवडून आले असले, तरी त्यांनी २००७ मध्ये स्वीकृत नगरसेवकपद उपभोगलेले असल्याने महापालिकेच्या कारभाराचा त्यांना चांगलाच अनुभव आहे.

महापौर, सत्तारूढ पक्षनेते आणि विरोधी पक्षनेते हे तिघेही चिखली या मोठ्या परिसराच्या वेगवेगळ्या भागातून निवडून आलेले आहेत. या तिघांकडूनही चिखली परिसराचा कायापालट होण्याची अपेक्षा तेथील नागरिकांना होती. प्रत्यक्षात विकासाची चिन्हे काही दिसत नाहीत आणि त्यादृष्टीने पावले उचलली गेली आहेत, हेही दिसून येत नाही. संपूर्ण चिखली परिसराचा फेरफटका मारल्यास शहराच्या अन्य भागातील झोपडपट्ट्यांचा परिसर चांगला आहे बुवा म्हणण्याची वेळ आल्याशिवाय राहत नाही. स्वच्छतेवर गप्पा मारणारे महापौर राहुल जाधव आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना आपल्या प्रभागातील रस्ते देखील स्वच्छ ठेवता नाहीत, असे चित्र पाहायला मिळते. काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता आणि देहू ते आळंदी हे दोन मोठे रस्ते चिखली भागातून जातात. या दोन्ही रस्त्यांनी प्रवास केल्यास चिखलीचा परिसर किती मागास आणि भकास आहे, याचे दर्शन घडते.

या दोन मोठ्या रस्त्यांची कधीच स्वच्छता ठेवली जात नाही. महापौर, सत्तारूढ पक्षनेते आणि विरोधी पक्षनेत्यांना आपल्याच प्रभागातील रस्ते स्वच्छ ठेवता येत नसतील, तर शहराच्या अन्य भागात जाऊन झाडू मारतानाचे फोटो काढण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा प्रश्न त्यांच्या भागातील नागरिकांना पडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी हा रस्ता महापालिकेच्या विकास आराखड्यात ३० मीटर रुंदीचा आहे. परंतु, कुदळवाडी उड्डाणपूल ते देहू-आळंदी रस्त्यापर्यंत तो २४ मीटर विकसित करण्यात आलेला आहे. देहू-आळंदी या रस्त्याचीही तीच गत आहे. हे सर्व आधीचे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कृपेने झाले आहे. आज चिखली परिसरात असंख्य गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे पुढील ५-१० वर्षांत या परिसराची लोकसंख्या वेगाने वाढणार आहे. अशा परिस्थितीत ३० मीटरचे रस्ते २४ मीटर करण्याचे परिणाम नागरिकांच्या जिवावर बेतणारी ठरणार हे कोणा भविष्यवेत्त्याला सांगण्याची गरज नाही. जिथे हे रस्तेच स्वच्छ ठेवले जात नाहीत, तिथे या दोन्ही रस्त्यांचे विकास आराखड्याप्रमाणे रुंदीकरण करण्याचा विचार महापौर किंवा सत्तारूढ पक्षनेत्यांच्या डोक्यात कधी येणार?, असा उपरोधिक प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

चिखली भागातील या दोन प्रमुख रस्त्यांची ही अवस्था असेल, तर अंतर्गत रस्त्यांची कल्पनाच न केलेली बरी. शहरातील सर्वात मागासलेला भाग कोणता?, असा प्रश्न केल्यास चिखली परिसराचा प्रथम क्रमांक लागेल, यात शंका नाही. हे वास्तव असताना महापौरपद मिळताच राहुल जाधव यांनी एक परदेश दौरा केला. तेथील विकासाची त्यांनी “याची देही याची डोळा” पाहणी केली. त्यानंतर महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने या तिघांनीही दिल्ली दौरा करून तेथील शाळांची पाहणी केली. आजपर्यंत यांच्यासारखेच यापूर्वीचे सर्व महापौर, सत्तारूढ पक्षनेते आणि विरोधी पक्षनेत्यांनी असे अनेक पाहणी दौरे केले आहेत. अशा सर्व दौऱ्यांवर झालेला खर्च बाहेर काढल्यास शहराच्या एखाद्या भागात असणाऱ्या झोपडपट्टीतील किमान दहा हजार कुटुंबांना तरी ५०० चौरस फुटाचे हक्काचे कायमचे घर बांधून देता येईल. परंतु, गरीबांची दया येणार कोणाला? करदात्यांच्या पैशांतून देश-विदेशात मौजमजा करून आलेल्या आजपर्यंतच्या सर्व नेत्यांनी नंतर शहर विकासात काय दिव्यदृष्टी दाखवली, हा संशोधनाचा विषय होईल.

महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने हे सुद्धा त्याच मार्गाने जाणारे आहेत, हे तिघांचाही प्रभाग पाहिल्यानंतर स्पष्ट होते. २०१७ च्या निवडणुकीत शहरवासीयांना खूप अपेक्षा दाखवून सत्ताधारी बनलेल्या भाजपच्या महापौर आणि सत्तारूढ पक्षनेत्यांकडून निश्चितच ही अपेक्षा नाही. विरोधी पक्षनेते दत्ता साने हे तीनवेळा नगरसेवक झालेल्या भागातही तीच परिस्थिती कायम असेल, तर आता तेथील नागरिकांना विचार करण्याची वेळ आली आहे. महापौर आणि सत्तारूढ पक्षनेत्यांनी शहराच्या इतर भागातील विकासाच्या गप्पा मारण्यापेक्षा आता आपल्या प्रभागाचा कायापालट करून दाखवण्याचे आव्हान स्वीकारले पाहिजे. महापालिकेचे संपूर्ण प्रशासन चालवणाऱ्या महापौर आणि सत्तारूढ पक्षनेत्यांना आपल्या प्रभागातील रस्ते साफ ठेवता येत नसतील, तर या दोघांच्याही लोकप्रतिनिधीत्वासाठी लाज आणणारी बाब आहे. शहरवासीयांना रोज आम्ही आमुक-तमूक करणार, असे गाजर दाखवण्यापेक्षा आणि अधिकाऱ्यांना सांगितलेल्या कामांतून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा किमान आपल्या प्रभागातील विकासकामे करण्याची देव सुबुद्धी देवो, हीच अपेक्षा.